११/०८/२०१७

भारतातल्या सर्वात जुन्या अरवली पर्वतरांगेतला सर्वात उंच किल्ला (तीन हजार ७६६ फूट) म्हणजे कुंभलगड. चीनच्या िभतीनंतर ४४ किलोमीटरची सर्वात लांब मानवनिर्मित तटबंदी म्हणजे कुंभलगड. कुंभलगडाची अशी अनेक वैशिष्टय़े आपण ऐकलेली असतात. त्यामुळे किल्ला पाहण्याची उत्सुकता वाढते. किल्ल्याचे भव्य बुरूज आणि दुहेरी तटबंदी आपले स्वागत करतात. कुंभलगडाचे प्राचीन काळी नाव होते मिच्छद्रगड. ८०० वर्षे अंधारात राहिलेल्या या किल्ल्याचे भाग्य राणा हमीरच्या काळात परत उदयाला आले. हमीरचे बालपण या किल्ल्यावर गेले होते. इसवीसन १४३३ मध्ये महाराणा कुंभाने हा किल्ला नव्याने बांधला. मेवाडमधल्या ८४ किल्ल्यांपकी ३२ किल्ले एकटय़ा राणा कुंभने बांधले आहेत. राणा कुंभने कुंभलगडाला आपली दुसरी राजधानी बनवले. इसवीसन १५९७ ला ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला (९ मे १५४०) महाराणा प्रतापसिंहाचा जन्म कुंभलगडावर झाला. किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर चढण्यासाठी व्यवस्थित मार्ग बनवलेला आहे. रामपोल, भरवपोल, निंबूपोल, पगडापोल हे दरवाजे ओलांडत आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याला याशिवाय तटबंदीत आरेटपोल, हल्लापोल, हनुमानपोल इत्यादी दरवाजे आहेत. बालेकिल्ल्यावर राणाकुंभ महाल आहे. वरच्या बाजूला चढून गेल्यावर महाराणा प्रतापांचे जन्मस्थान आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात फतेह प्रकाश नावाचा राजवाडा आहे. या राजवाडय़ाच्या गच्चीवरून संपूर्ण किल्ला, तटबंदी आणि आजूबाजूचा दुर्गम परिसर दिसतो. किल्ल्यावर अनेक मंदिरे आहेत. किल्ला उतरून परत पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन मंदिर पाहायला जाता येते. या ठिकाणी दररोज संध्याकाळी लाइट आणि साऊंड शो असतो.