भारतातील महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते.

याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना जबाबदार असत.

अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यांत आले हे शिवाजीच्या राज्याभिषेकासंबंधी उपलब्ध असेलल्या वर्णनावरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्यला पक्वान्‍नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्यला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते,.

राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.
शिवाजीच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.
  1. पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.
  2. पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
  3. पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्‍या येणार्‍या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
  4. मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
  5. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
  6. पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
  7. न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
  8. पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
“प्रधान अमात्य सचीव मंत्री,
सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री,
सेनापती त्यात असे सुजाणा,
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा” ।।

मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita