मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखीलअसून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.
नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा पंचकल्याणक, प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये संपन्न होणार आहे. हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे ४५०० फूट उंचीवर साकारण्यात आलेला आहे. हे काम पूर्ण होण्यास सुमारे एकोणीस वर्षे एवढा अवधी लागला.
ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम १२० फूट लांबीच्या कापडावर या प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्याबरहुकूम ही मूर्ती घडविण्यात आली. मूर्तीची रचना निश्‍चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता. त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानासह पाली, संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला. जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखांचाही अभ्यास करण्यात आला. संस्कृत, ताडपत्रांवरील ग्रंथ, तामिळ, कन्नड, तेलगू, वैष्णव ग्रंथ, द्रविड, हीडा, ग्रीक मायथॉलॉजी आदी ग्रंथांतील वर्णनांचा अभ्यास झाला. त्यात उल्लेख असलेले अंगुलीचे प्रमाण अभ्यासण्यात आले. त्याचे रूपांतर फुटांत करून मूर्तीचे परिमाण निश्‍चित करण्यात आल्याने ही विश्‍वातील सर्वांग सुंदर मूर्ती तयार झाली आहे. त्यामुळे मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे जागतिक तीर्थस्थळ होऊ घातले आहे.
अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीच्या काळ्या बसाल्ट पाषाणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अधिक टिकाऊ व सर्वांग सुंदर मानली जात आहे. जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या या १०८फुटी मूर्तीची नोंद लवकरच गिनीज बुकमध्ये केली जाणार आहे. या मूतीची साधारण मापे अशी आहेत:
 • डोक्याचे केस - ५ फूट
 • मुख - १२ फूट
 • मान - ४ फूट
 • कान - १४ फूट
 • मान ते छाती - १२ फूट
 • छाती ते नाभी - १२ फूट
 • नाभी ते टोंगळे - ३६ फूट
 • टोंगळे - ४ फूट
 • टोंगळे ते पायाचा घोटा - २९ फूट
 • तळपाय - ४ फूट
 • कमळ - ५ फूट
 • चौथरा - ३ फूट
अशा भव्य आकाराची ही मूर्ती आहे.
या मूर्तीपर्यंत पोचण्यास तीन प्रकारचे मार्ग तयार करण्यात येत आहेत. या पुतळ्याच्या जागी पोहोचण्यास ४ लिफ्टही तयार करण्यात येत आहेत.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत.
डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा , शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात. मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत. मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावरील राहायची सोय

भिलवाड गावातील ट्रस्टच्या धर्मशाळा आहेत. राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र भाडे आहे.

गडावरील खाण्याची सोय

भिलवाड गावातील ट्रस्टच्या मंदिरात खाण्याची सोय आहे. जेवण केवळ रु. ४० प्रतिव्यक्ती इतके नाममात्र आहे.

गडावरील पाण्याची सोय

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे.


वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita