११/०४/२०१७

पुण्याचे वेरूळ भुलेश्वर
पुण्याच्या दक्षिणेकडून पूर्वेला जी एक भलीमोठी डोंगररांग गेली आहे, तिच्या अगदी शेवटी भुलेश्वरचा डोंगर आहे. या डोंगरावरच हे शिल्पकृतींनी नटलेले शैलमंदिर आहे. या भुलेश्वरला येण्यासाठी दोन मार्ग. एक पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवतहून (५१ किलोमीटर), तर दुसरा पुणे-बारामती मार्गावरील सासवडहून (४६ किलोमीटर) आहे. पण येता-जाता स्वतंत्र मार्ग वापरल्यास दोन्हीकडचा प्रदेश न्याहाळता येतो.

ऐन डोंगरधारेवर हे मंदिर. पायाशी माळशिरस गाव. या गावातूनच एक रस्ता मंदिरापर्यंत जातो. ही वाट चढतानाच बुरुज, तटबंदीचे बांधकाम दिसते आणि मग इथे एक गड असल्याचेही लक्षात येते. दौलतमंगळ असे या गडाचे नाव. इतिहासात फारसा चर्चेत नसलेला हा गड इसवी सन १६३४ मध्ये विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी बांधला. त्याचे काही बुरूज, एक दरवाजा, पायऱ्यांचा मार्ग, प्राचीन विहिरी, कुंडे, मुस्लिम प्रार्थनास्थळ असे काही अवशेष आजही इथे दिसतात.या अवशेषांमधूनच एक घाटमार्ग मंदिराकडे निघतो. या वाटेवरच एका बुरुजाला खेटून जनूबाईचे मंदिर लागते. बाहेरून साधेसुधे वाटणाऱ्या या मंदिरातील छत आणि खांबांवरील नक्षीकाम मात्र पाहण्यासारखे आहे. अनेक देवतांच्या जोडय़ा त्यांच्या वाहनांसह इथे छतावर साकारलेल्या आहेत.

हे मंदिर पाहात पुढे मुख्य मंदिराकडे वळावे. जवळ पोहोचताच तटबंदीयुक्त या भुलेश्वर मंदिराची भव्यता ध्यानी येते. मूळ मंदिर तेराव्या शतकातील, तर सभोवतालचा तट, नगारखाना आणि चुन्यातील शिखरे ही पुढे अठराव्या शतकातील मराठा शैलीची. कुठलीही वास्तू, तिचे स्थापत्य पाहताना काळ आणि शैलीतील हा फरक- वेळोवेळी झालेला बदल लक्षात घेतला नाहीतर गोंधळ होऊ शकतो.

मंदिराकडे निघणाऱ्या पायरीमार्गाभोवतीच्या कठडय़ापासूनच भुलेश्वरची ही शिल्पसृष्टी आपल्याला भुलवू लागते. गजथर, यातही काही ठिकाणी हत्तीवर हल्ला करणारा सिंह, सिंहाशी लढणारा वीरपुरुष अशी काही शिल्पं इथे दिसतात. याच ठिकाणी जय-विजय द्वारपालांची मोठी शिल्पं आहेत.

मंदिराचा बाहय़ भाग हा मराठा कालखंडातील. यातील खालचा भाग दगडात तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला आहे. यातील चुनेगच्ची बांधकामावर सजावटही केलेली आहे. यात विष्णूचे दशावतार, गणेश, शेषशाही, शक्तिदेवता आदी शिल्पं साकारलेली आहेत. हे सारे पाहातच आपण मंदिराच्या नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराला नंतर जोडलेला हा भाग. पुढे सभागृह येते. यानंतर दोन्ही बाजूला असलेल्या पायरीमार्गाने आपण मूळ मंदिराच्या भागात येतो.

इथे आलो, की आतापर्यंत साधेसुधे वाटणारे हे मंदिर एकदम श्रीमंत वाटू लागते. मुख्य मंदिराच्या आत हे मूळ मंदिर! नंदीमंडप, अंतराळ, गर्भगृह अशी इथली पुन्हा स्वतंत्र रचना आणि या साऱ्यांवर मुक्तहस्ते केलेले कोरीवकाम. जणू एखाद्या सुरक्षित कुपीत ठेवलेला किमती दागिनाच!

एवढा वेळ बाहेरील साधे बांधकाम पाहिल्यावर शिल्पकामाचा हा आविष्कार पाहून उडायलाच होते. झिरपणाऱ्या अंधार-प्रकाशात ही शिल्पकला भोवतीने गूढ बनून उभी असते. जणू एखादे लेणेच. सुरुवातीस बारा सालंकृत खांबांवरचा नंदीमंडप लागतो. याच्या मध्यभागी कोरीव नंदी विराजमान आहे. या नंदीमंडपाच्या छताच्या किनारीवर वादक, नृत्य करणाऱ्या कलाकारांची रांग कोरलेली आहे. या नंदीच्या उजव्या बाजूस एका ओटय़ावर कासव कोरलेले आहे. त्यावर बहुधा पूर्वी नंदी असावा. नंदी मंडपाच्या नंतर अंतराळ (गाभाऱ्यापूर्वीचा छोटा मंडप) आणि त्यानंतर गर्भगृह येते. यातील अंतराळाचे खांब व गर्भगृहाच्या दरवाजावरचे कोरीवकाम थक्क करते. पाने-फुले, पशू-पक्षी, वेलबुट्टी नक्षीचा इथे मुक्तहस्ते वापर केला आहे. उंबरठय़ावर दोन्ही बाजूस कीर्तिमुख तर शिरोभागी गणेशपट्टीची रचना केली आहे. गाभाऱ्यात शिवलिंग असून, त्याच्या बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. या मंदिराच्या बाहय़ भिंतीवरही अर्धउठावातील मोठे कोरीवकाम केले आहे. यामध्ये मुख्यत्वे शंकर, पार्वती, गणेश, विविध शक्तिदेवता आदी देवतांपासून यक्ष, अप्सरा, सूरसुंदरींच्या मूर्तीची रचना केलेली आहे. यात सूरसुंदरींच्या तर विविध भावमुद्रा दिसतात. हे सारे पाहतानाच मागील बाजूला तीन एकत्रित मूर्तीच्या शिल्पपटांकडे अवश्य लक्ष द्यायचे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतांच्या जोडीने इथे गणेशाला स्त्रीरूपात दाखवले आहे. ओळखीसाठी या देवतांची वाहने त्यांच्याखाली कोरलेली आहेत. देवतांना असे स्त्रीरूपात दाखवण्यामागे 'स्त्रीशक्ती'विषयी आदर असावा. यातील स्त्रीरूपातील गणेशाला वैनायकी, लंबोदरी किंवा गणेशानी अशी नावे आहेत. अतिशय दुर्मिळ असा हा शिल्पपट इथे येणाऱ्यांनी पाहिलाच पाहिजे असा.

मंदिराच्या समोरील भिंतीवर रामायण-महाभारतातील काही प्रसंग कोरलेले आहेत. यात काही युद्धांचे जिवंत देखावेदेखील आहेत. हे सारे प्रसंग साकारताना हत्ती, सिंह, बैल आदी प्राण्यांबरोबर उंटांचाही वापर केलेला आहे. आपल्या स्थापत्यावरील उंटाचा हा वापर विशेष वाटतो.

भुलेश्वरची ही सारी शिल्पसृष्टी पाहताना भारावून जायला होते. मनाचा गोंधळ उडतो. यातील बहुतेक शिल्पांपर्यंत मूर्तिभंजकांचे हात पोहोचलेले आहेत. पण या हल्ल्यांनाही पराभूत करत ही शिल्पकला मनाचा ठाव घेत राहते. ..भंगते ती केवळ मूर्ती, कला अभंगच राहते!

इथल्या भिंतीवर फार पूर्वी चित्रकाम असल्याची नोंद ब्रिटिशांनी करून ठेवली आहे. पण आज असे चित्रकाम इथे आढळत नाही. यवनांच्या हल्ल्यात जिथे इथल्या मूर्ती भंग पावल्या तिथे या चित्रांना त्यांचे रंग सांभाळणे शक्यच नव्हते.

भुलेश्वरची ही सारी शिल्पसृष्टी पाहात मंदिराच्या तटावर यावे. दूरवरचा प्रदेश नजरेत येतो. डोंगर-दऱ्या, झाडी-तलाव, हिरवीगार शेते, छोटी-छोटी खेडी हे सारे पाहताना त्यामध्ये मन गुंतत जाते. काही काळासाठी सारी सृष्टीच थांबल्याचा भास होतो. या साऱ्याच्या पाश्र्वभूमीवर भुलेश्वरचे हे मंदिर ध्यानाला बसलेल्या एखाद्या तपस्वीप्रमाणे भासते. गिरिशिखरावरची ही शांतता गूढ-रम्य वाटू लागते.

..कधीकाळी त्या अरण्यजोगी 'शिवा'लाही या स्थळकाळाने भुलविले. मग त्याला भुलविण्यासाठी पार्वतीने भिल्लिणीचे रूप घेतले! ..भुलेश्वरचा भुलवण्याचा हा प्रवास कधीकाळापासून सुरूच आहे. संदर्भ: Loksatta
लेखक :anonymous
छयाचित्रे: www.tripadvisor.in

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search