१२/२४/२०१७

अर्नाळा

अर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोंकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते, त्यामुळे येथून खाडीच्या सर्व प्रदेशावर येथून नजर ठेवता येत असे.


इतिहास


चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील ठिकाणे

अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४ हेक्टर असून, तटबंदीमध्ये असलेले एकूण नऊ बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:
'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'
या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा (की मलिक तुघाण) आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत होते. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावरून उभे राहिल्यावर डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत.
किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानीमातेची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्याआहेत. तळ्यातले पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी, तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्याच्या सभोवार तीन-चार हजार मुख्यत: कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनापासून अर्नाळा गाव अंदाजे १० कि.मी. असून तेथे जाण्यास महापालिकेची बस, एस. टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्रकिनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. ह्या होड्या सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होडक्यांनी किल्ल्यावर जाता येते.समुद्रकिनाऱ्यावर सुरूची बने आणि फळझाडांच्या बागा आहेत.सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय येथेच होऊ शकते, किल्ल्यावर काहीही मिळत नाही.


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search