वासुदेव म्हणजे लोकसंस्कृतीतला एक महत्त्वाचा घटक. कधी काळी गाव जागवत येणारा हा वासुदेव आता उपजीविकेसाठी गावाकडून शहरात स्थलांतरित झालाय. पण त्याला आता कुठेच हक्काचं दान मिळत नाहीय...
कोकणात एकदा भाताची सराई पिकली की दिवाळीचे दीप मावळल्यावर घाटावरून नाना मांगतेकरी कोकणच्या आगरात उतरतात. त्यात दरसालचा नंदीबैल प्रमुख. त्याच्या जोडीला सुया घ्या, पोत घ्या करीत विकणाऱ्या गोसाविणी, कोकेवाला, जादूवाला, डोंबारी, गुण्याबैल, जरीमरीचा भगत, ज्योतिषी असे कितीतरी जण आपल्या आयुधांसह लोकांचे मनोरंजन करीत भिक्षा मागत गावोगाव फिरत असतात. त्यात वासुदेव विरळा. छल्लक् छल्लक् टाळ वाजवीत गाव जागवीत येणारा वासुदेव कोकणच्या वाट्याला वाटेला फारसा नाहीच.
पूर्वी पहाटेला जात्याच्या घरघरीतून ओव्या प्रकटायच्या. त्याचवेळी-
वासुदेव आला हो वासुदेव आला 
असे गाणे गात एका हातातली चिपळी व दुसऱ्या हातातले टाळ, मध्ये पावा वाजवीत अंगणात वासुदेव आलेला असायचा. गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यावर मोरपिसांची निमुळती उंच टोपी, अंगात घोळदार झगा, पायांत घुंगरू, खांद्यावर शेला, काखेत झोळी असा सुरूप दिसणारा वासुदेव आपल्या अंगणात आला की, प्रत्यक्ष श्रीकृष्णच भेटीस आलाय असे वाटायचे. मग घरातील आयाबाया, पोरेबाळे त्याचे दर्शन घेत. त्याच्या झोळीत सुपातून धान्य टाकीत, हातावर आणा ठेवीत. त्यावेळी वासुदेव आनंदून -
दान पावलं दान पावलं
शंकराच्या नावानी इट्टलाच्या नावानी
भाग्यीवंत माउली दान पावलं
असे गाता गाता श्रीकृष्णाची, जानाईची, चांगुणेची गाणी गायचा.
वासुदेव ही महाराष्ट्रातील एक भिक्षेकरी जात. त्यांना धुकोट नावानेही ओळखतात. हे लोक दक्षिण महाराष्ट्रात जास्त दिसतात. कुणबी स्त्रीला ब्राह्माण ज्योतिष्यापासून सहदेव नावाचे मूल झाले, त्यापासून वासुदेवाची उत्पत्ती झाली असे ते मानतात. वासुदेव - भिक्षेकरी होण्याचा एक विधी असतो. शुभ दिवशी पुरोहिताला घरी बोलावून आणतात. तो ज्या मुलाला वासुदेवाची दीक्षा द्यायची आहे त्याला वासुदेवाचा पोशाख घालायला सांगतो आणि समंत्र त्या मुलाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो, की मग तो मुलगा वासुदेव होतो. चारी दिशा गाणी गात भिक्षा मागण्यास मुक्त होतो.
अशा वासुदेवाचे दर्शन मला कोकणात झाले नाही. नवी मुंबईत वास्तव्यास आल्यावर पावसाळा निघून गेल्यावर भल्या पहाटे कानावर छल्लक् छल्लक् चिपळ्या-टाळांचे आवाज कानी येऊ लागले. त्यापाठोपाठ खड्या आवाजात श्रीकृष्ण-पांडुरंग विठ्ठलाची गाणी. घराच्या खिडकीतून खाली पाहिले, मोरपिसांची टोपी घातलेला वासुदेव गाणी गात खिडक्यांतून कुणी टाकले पैसे गोळा करीत होता. गावाला वासुदेवाला आदराने, दान दिले जाते. इथे पैसे फेकून दिले जातात... झोळीत धान्य तर पडतच नाही.
एके सकाळी वासुदेवाशी संवाद साधला. म्हणालो, 'वासुदेवा, तुझा प्रदेश गावाकडचा, तू इथे नव्या मुंबईत कसा काय?' त्यावर नूर उतरलेला वासुदेव म्हणाला, 'मास्तर, पोटासाठी अलूया इथं. गावाकडं पोट भरना' - त्याचे डोळे पाणावले होते.
'गावाकडे पैसे, धान्य असं दान मिळतं, इथं?' मी म्हणालो.
'नाय मास्तर, गावाकडं आमाला हल्ली कोन इचारत नाय. कुनब्यांची पन शेती ऱ्हायली नाय... ते तरी जोंधळं कुटूनशान घालनार आमाला. आमची नवी पिढी वासुदेवाची दीक्षा घेत नाय हल्ली. म्हनलं जाव या ममईत... पोट भरल-'
'मग इथं कसं काय?'
'काय नाय मास्तर सगलं वैरान हाय... इथंपन वासुदेवाइषयी कुनाला आपुलकी नाय हाय... यखांद्या बिल्डिंगमधी यखाददुसरा कुनी चार-आठानं टाकतं... यखाद्या बिल्डिंगमधी कायबी नाय-... वासुदेवाचं दीस खपलं...' वासुदेवाने डोळे पुसले.
... वासुदेव पूर्वी सकाळी गाव जागवीत यायचा. लोकांना ते श्रीकृष्णाचे रूप वाटायचे. मुंबईत आता कामावर जायला लोक वासुदेवाच्या आगमनाआधी जागेच असतात. त्यांना उठवायची गरज काय? आणि त्यांना हरिनामात मौज काय? ग्रामसंस्कृतीशी घेणे-देणे काय?...
भरदुपारी वासुदेव माझ्यापुढे पैशासाठी हात न पसरता पुढे झाला होता. मग मीच जाऊन त्याच्या हातात काय पैसे ठेवले. सुपातून दान द्यायला माझ्याकडे सूप नव्हते आणि घरच्या शेतातील धान्यही नव्हते. वासुदेव दिले दान कपाळी लावून नमस्कार करून निघून गेला. माझ्या ओठातून शब्द आले - वासुदेव गेला हो, वासुदेव गेला
साभार - शंकर सखाराम

https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita