दक्षिणेत विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्र यांत पाचव्या शतकात उदयास आलेला एक प्रसिद्ध वंश. या वंशाची एक शाखा अधिक प्रसिद्ध पावली. ती म्हणजे बादामीचे चालुक्य व त्यांचे वंशज कल्याणीचे चालुक्य, याशिवाय त्यांच्या इतर लहान शाखा गुजरात, तेलंगण व इतरत्र पसरल्या होत्या. कोरीव लेखांत या घराण्याचे नाव चालिकी, साल्की, चलिक्य, चालुक्य, चलुकिक इ. विविध प्रकारांनी आढळते. हे घराणे मूळचे कर्नाटकातील; पण दहाव्या शतकापासून दक्षिणेतील कल्याणीच्या राजवंशाने स्वतःस सोमवंशी कल्पून उत्तरेतील सुप्रसिद्ध पौराणिक सोमवंशाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. उलट बादामी चालुक्यांची एक शाखा
वेमुलवाड्याचे चालुक्य स्वतःस सूर्यवंशी म्हणवीत. या घराण्याचा मूळ पुरुष उदयन व त्यानंतरचे अठ्ठावन राजे अयोध्येस राज्य करीत होते, त्यातील शेवटचा विजयादित्य दक्षिणेत आला. त्याने त्रिलोचननामक पल्लव राजाचा पराजय केला. त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या त्याच्या विष्णुवर्धननामक पुत्राने चालुक्य पर्वतावर भगवती, नंदा गौरी, कार्तिकेय, नारायण, सप्तमातृका या देवतांची आराधना केली आणि कदंब, गंग इ. राजवंशांना जिंकून आपले राज्य स्थापिले इ. काल्पनिक कथा उत्तरकालीन लेखात दिली आहे. या राजवंशाच्या चालुक्य नावाची उपपत्ती तो ब्रह्मदेवाच्या किंवा हारिति–पंचशिख ऋषीच्या चुलुकातून (ओंजळीतील पाण्यापासून) निर्माण झाला, असे सांगून लावली आहे.
बादामीचे चालुक्य : बादामीचे चालुक्य घराचे प्राचीन भारतीय इतिहासात सुप्रसिद्ध आहे. एके काळी यांची सत्ता दख्खनच्या बहुतेक भागावर पसरली होती. यांनी बांधलेल्या अनेक देवालयांत एका विशिष्ट स्थापत्य पद्धतीचा उपयोग केला असल्यामुळे ती चालुक्य स्थापत्य पद्धती म्हणून प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या काळी संस्कृत व कन्नड भाषांत अनेक उत्तम प्रकरणे, काव्ये रचली गेल्यामुळे त्यायोगेही यांचे नाव भारतीय वाङ्मयात सुविख्यात झाले आहे. हे स्वतःस मानव्य गोत्री, हारितीचे वंशज, सप्तमातांनी किंवा सप्तलोकमातांनी वाढविलेले, स्वामी महासेनाची भक्ती करणारे भगवान नारायणाकडून वराहलांछन मिळविलेले व पौंडरिक, अश्वमेध, बहुसुवर्ण, वाजपेय इ. यज्ञ केलेले असे म्हणजे क्षत्रिय म्हणवीत.
या राजवंशाच्या इतिहासाची साधने मात्र थोडी आहेत. त्यात कोरीव लेख मुख्य आहेत. यावरच त्यांचा इतिहास प्रामुख्याने आधारित आहे. थोडी माहिती यूआन च्वांग या चिनी यात्रेकरूच्या प्रवासवर्णनावरून आणि चरित्रावरून मिळते. इराणचा राजा द्वितीय खुसरौ याचा या वंशातील ⇨दुसरा पुलकेशी राजाशी पत्रव्यवहार व राजदूतांची देवघेव झाली होती, त्याविषयीचा एक उल्लेख एका फार्सी बखरीत आढळतो. अजिंठ्यातील एका चित्राकडे तो दूत व पुलकेशी यांच्या भेटीबाबत बोट दाखविले जाते; पण ते अचूक नाही अशी आजची समजूत आहे. सामान्यतः यांची नाणी अद्यापि सापडली नाहीत. केवळ अलीकडे यांनी गुजरातेत स्थापलेल्या घराण्यातील जयाश्रय राजाचे नाणे सापडले आहे. त्यावरून बादामीच्या मुख्य घराण्याचीच नाणी पुढेमागे सापडतील, अशी आशा उत्पन्न झाली आहे. संस्कृत व कन्नड भाषांत तत्काली रचलेली बहुतेक प्रकरणे, काव्ये आता कोरीव लेखांतील व इतर उल्लेखांवरून ज्ञात झाली आहेत; पण कन्नड ग्रंथ आज उपलब्ध नाहीत.
कोरीव लेखांत या घराण्यांचा मूळ पुरुष म्हणून जयसिंहाचा उल्लेख येतो, पण तो व त्याचा पुत्र रणराग यांच्याविषयी काही माहिती मिळत नाही. रणरागाचा पुत्र प्रथम पुलकेशी याचा ५४३-४४ चा लेख बादामीच्या किल्ल्यात सापडला आहे. त्याने वातापिपूर (बादामी) येथे आपली राजधानी स्थापिली. चालुक्य राजवंशाचा हा पहिला बलाढ्य राजा होय. याने अश्वमेघ, अग्निष्टोम, वाजपेय, बहुसुवर्ण, पौंडरिक यासारखे श्रौत याग केले होते व हिरण्यगर्भनामक महादान दिले होते.
प्रथम पुलकेशीला प्रथम कीर्तिवर्मा व मंगलेश असे दोन पुत्र होते. पैकी कीर्तिवर्म्याने गादीवर आल्यावर कर्नाटकातील कदंब, कोकणातील मौर्य व मध्य प्रदेश-ओरिसातील नल राजांवर विजय मिळवून आपली साम्राज्यसत्ता पसरविली. हा निधन पावला तेव्हा त्याचा पुत्र द्वितीय पुलकेशी हा अल्पवयी असल्यामुळे ह्याचा धाकटा भाऊ मंगलेश हा ५९७-९८ मध्ये गादीवर आला. उत्तर भारतात स्वारी करून गंगातीरी आपला धर्मस्तंभ उभारण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. म्हणून त्याने आपल्या राज्याच्या उत्तरेस महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या कलचुरी नृपती बुद्ध (बुद्धरस) या राजावर स्वारी करून त्याचा पराजय केला. पण इतक्यात रेवतीद्वीप (वेंगुर्ल्याजवळचे रेडी बेट) येथे राज्य करणाऱ्या स्वामिराजनामक मांडलिकाने बंड केल्यामुळे त्याला त्याचे पारिपत्य करण्याकरिता तातडीने जावे लागले. त्यामुळे त्याचा उत्तर भारतातील संकल्पित दिग्विजय घडून आला नाही.
मंगलेशाने आपल्या मागून आपल्या पुत्रास गादी मिळावी, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.
https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/posts/851432785018730