१/०३/२०१८

घाट
देशावरून कोंकणांत यावयाचें म्हणजे मध्यंतरीं सह्याद्रि पर्वत लागतो. कुलाबा व ठाणा जिल्ह्याची एक सरहद्द सह्याद्रि पर्वतानेंच आंखली गेली आहे. त्या पर्वतावरून पलीकडे येण्याकरितां जे मार्ग आहेत त्यांस घाट असें म्हणतात. असे हे घाट ठिकठिकाणीं आहेत. महाबळेश्वरापासून राजमाचीपर्यंत जे घाट आहेत त्यांचीं नांवेः-
पार घाट- महाडाच्या आग्नेयीस सुमारें १५ मैलांवर किनेश्वरजवळ आहे. हा केवळ पायरस्ता असून येथून महाबळेश्वरास जातां येतें. इ. स. १८२६ सालीं वंजारी लोक या मार्गानें कोंकणांतून धान्य व मीठ नेत असत.
फिट्झजेरल्ड घाट- पारघाटाच्या उत्तरेस अर्ध्या मैलावर कापडें खुर्द या खेड्याजवळ हा घाट आहे. सातार्‍यास जाणार्‍या मार्गावर हा घाट आहे. येथून व्यापार बराच चालतो. महाडहून वाई व नहर येथें आणि वाई व नहरहून महाड येथें दरवर्षीं व्यापाराकरितां पुष्कळ माल येतो. कापडें येथें दस्तुरी होती.
ढवळा आणि कामठा घाट- फिट्झजेरल्ड घाटाच्या उत्तरेस सुमारें ५॥ मैलांवर आहेत. हे फक्त पायरस्ते असून यांचा कोणी फारसा उपयोग करीत नाहीं. या मार्गानें भोर संस्थानांतून वाई येथें जातां येतें.
वरंधा घाट- कामठा खिंडीच्या उत्तरेस पांच मैलांवर वरंधा नांवाच्या खेड्याजवळ हा घाट आहे. या घाटांतून हिरडोशी-भोर या गांवावरून पुण्यास रस्ता जातो. इ. स. १८६७ सालीं हा रस्ता तयार झाला. या घाटांतून बराच व्यापार होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेस पाव मैलावर माझेरीजवळ उंबर्डें घाट आहे. पायरस्त्याप्रमाणेंच याचा उपयोग होतो.
गोप्या घाट-उंबर्डे घाटाच्या उत्तरेस चार मैलांवर शिवतरजवळ गोंदे-पुणें रस्त्यावर हा घाट आहे. आंबेनाळ घाट- गोप्या घाटाच्या उत्तरेस एक मैल आंबेशिवतरजवळ हा घाट आहे येथून पुण्यास जाण्यास मार्ग आहे परंतु व्यापाराकरितां याचा कोणी उपयोग करीत नाहींत.
मढ्या घाट- आंबेनाळ घाटाच्या उत्तरेस एक मैलावर वाकी बुद्रुख खेड्याजवळ हा घाट आहे. येथून पुण्यास जाण्यास मार्ग आहे.
शेवत्या घाट- मढ्या घाटाचे उत्तरेस अर्ध्या मैलावर हा घाट आहे. येथून भोर संस्थानांतील पांगारा व तोरणा या गांवांवरून पुण्यास जाण्यास मार्ग आहे.
कावळ्या घाट - शेवत्या घाटाच्या उत्तरेस सहा मैलांवर हा घाट आहे. फक्त पायरस्ता आहे.
कुंभ घाट- कावळ्या घाटाच्या उत्तरेस आठ मैलांवर आहे. मशीदवाडी रस्त्यांतून हा रस्ता जातो. फक्त पायरस्ता आहे.
लिंग घाट- कुंभ घाटाच्या उत्तरेस चार मैलांवर लिंग घाट आहे. येथून ओझीं लादलेली जनावरें येऊं शकतात.
निसणी घाट- लिंग घाटाच्या उत्तरेस दोन मैलांवर हा घाट आहे. हा फक्त पायरस्ता असून चढ अतिशय आहे.
ताम्हाणें, देवस्थळी व थिव घाट- निसणी घाटाच्या उत्तरेस सहा मैलांवर माणगांवच्या ईशान्येस १४ मैलांवर असलेल्या विळे खेड्याच्या सरहद्दींत हे घाट आहेत. हे फक्त पायरस्ते आहेत.
पिंपरी घाट- ताम्हाणे घाटांच्या उत्तरेस चार मैलांवर पिंपरी घाट आहे. येथून ओझीं लादलेलीं जनावरें येऊं शकतात. हा घाट फार उपयोगांत आहे.
या घाटांपैकीं फिट्झजेरल्ड घाट, वरंधा घाट, पिंपरी घाट, आंबोली घाट, तळ घाट, बोर घाट, नाना घाट, कसुर घाट वगैरे घाटांतून बैलांवरून व्यापार होत असे. बाकीचे बहुतेक घाट फक्त पायरस्ते होते.
ठाणें जिल्ह्याच्या पूर्वेकडील सरहद्दीवर ११५ मैल सह्याद्रि पर्वत आहे. या भागावर असलेले घाट खालीं लिहिल्याप्रमाणें.
अंबोली घाट- त्रिंबकहून मोखाड्यास जातां येतें. घाट सोपा आहे.
चंद्रे आणि हुंबे मेट- हे दोन मार्ग त्रिंबकहून मोखाड्यास जाण्याकरितां आहेत. चंद्रे मेट सोपा आहे. हुंबे मेट हा फक्त पायरस्ता आहे.
गोंदे घाट- त्रिंबकहून जव्हार. जव्हार संस्थानांतील बराच व्यापार या घाटांतून होत असे.
शीर घाट- त्रिंबकहून वसईस जाण्याकरतां हा घाट होता. हल्लीं येथून गाड्या जाऊं शकतात. वंजारी लोक बैलावरून नाशिक येथून भिवंडी व वाडा येथें माल नेत असत.
तळ घाट- कसारा आणि इगतपुरी यांच्या दरम्यान हा खडी घातलेला रस्ता आहे. इ. स. १८२६ सालीं हा सर्वांत सोपा रस्ता होता. बैलगाड्या येथून जात असत. हल्लीं रेल्वे झाल्यामुळें या मार्गावरून व्यापार कमी होतो.
पिंप्री घाट- नाशिकहून वसई किंवा कल्याण येथें जाण्यास हा घाट फार सोयीस्कर होता.
चोंढे-मेंढे- अहमदनगर जिल्ह्यांतील अकोला व राजुर गांवांहुन शहापुर व भिवंडी येथें जाण्याकरितां याचा उपयोग होत असे. या मार्गानें धनगर लोक कोंकणांत मेंढरें व बकरीं विकावयास घेऊन येत.
साद्रे घाट- अकोला तालुक्यांतून मुरबाड तालुक्यांत या घाटानें उतरतां येत असे. हा अतिशय कठिण रस्ता होता. दरोडेखोरांच्या टोळ्या कोंकणांत दरोडे घालण्याकरितां याचा उपयोग करीत.
निसणी घाट- मुरबाड तालुक्यांतून जुन्नर तालुक्यांत जाण्याकरितां. हाहि फार अवघड आहे. पायरस्ता म्हणून देखील कोणी हल्लीं हा फारसा उपयोगांत आणीत नाहीं.
माळसेज घाट- अहमदनगरहून कल्याणास जातांना लागणारा घाट. येथून हत्ती, उंट जाऊं शकत असत.
भोरांडे घाट- मुरबाड तालुक्यांतून जुन्नर तालुक्यांत जाण्याकरितां. हा घाट कठिण असून फक्त कोळीच याचा उपयोग करतात.
नाना घाट- मुरबाड तालुक्यांतून जुन्नर तालुक्यांत जाण्याकरितां. तळघाट आणि बोरघाट यांच्या खालोखाल या घाटाचा उपयोग होत असे.
पलु घाट- कल्याण ते जुन्नर पायरस्ता.
कुटे घाट- मुरबाड तालुक्यांतून खेड तालुक्यांत जाण्याकरितां. हा फार अवघड असून फक्त कोळीच याचा उपयोग करतात.
गोवेली घाट- मुरबाड तालुक्यांतून खेड तालुक्यांत जातो. हा अवघड पायरस्ता आहे.
अवापे घाट- पायरस्ता. मुरबाड तालुक्यांतून खेड तालुक्यांत जातो.
शिदगड घाट- वरील प्रमाणेंच.
भीमाशंकर - देशावरून पनवेल पर्यंत जाणारा रस्ता. पूर्वीं या घाटानें गूळ वगैरे कोकणांत येत असे.
कसुर- सुस्थितींत आहे.
राजमाची घाट. यास कोंकण दरवाजा म्हणत.

https://www.facebook.com/Amhichtevede

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search