२/१९/२०१८

छत्रपती शिवाजीमहाराजज्या पुरूषास कधी कोणतेही दुर्व्यसन शिवले नाही,ज्यांनी परस्त्रीस मातेसमान मानले,ज्यांनी स्वधर्माप्रमाणेच परधर्मास आदर दाखवला,ज्यांनी युद्धात पाडाव केलेल्या शत्रूचे लोकांस त्यांच्या जखमा बर्या करून स्वगृही पाठवले,ज्यांनी फौज,किल्ले,आरमार इत्यादी योजनांनी स्वदेशसंरक्षणाची योग्य तजविज करून ठेवली , ज्यांनी सर्वांचे आधी स्वतः संकटात उडी घालून आपल्या लोकांस स्वदेशाची सेवा करण्यास शिकवले,ज्यांनी अनेक जिवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धीसामर्थ्याने स्वतःचा बचाव केला,
ज्यांनी औरंगजेबासारख्या प्रतापी बादशहाचे भगीरथ प्रयत्न सतत तीस वर्ष पोवतो यत्किंचित चालू दिले नाहीत ,इतकेच नव्हे, तर तीन राज्यांचा पाडाव करून अखिल भारतखंडात अपूर्व असे स्वराष्ट्राचे स्वतंत्र राज्य स्थापन करून,त्याची किर्ती पृथ्वीवर अजरामर करून ठेवली; त्या प्रतापी व पुण्यशिल पुरूषाची योग्यता पूर्णपणे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे! पुण्यात प्रत्यक्ष राहत्या वाड्यात पाच वर्ष्े पावतो औरंगजेबाचे सुभेदार तळ ठोकून बसले,तेव्हा त्याची ती मगरमिठी सुरतेचे नाक दाबून मोठ्या युक्तीने शिवाजी महाराजांनी सोडवली,या त्यांच्या युद्धकौशल्याची इतिहास सदैव तारीफच करत राहील.
कोणास कधी जागिरी अगर जमिनी तोडून न देणारे, न्यायाचे कामात कोणाची भीडमुर्वत न धरणारे,दुष्टांचा काळ पण गरिबांचा कनवाळू,एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारे ,सदैव सावध व उद्योगी,नेहमी मातेच्या अर्ध्या वचनात राहून सतत राष्ट्राची चिंता वाहणारे ; स्वदेश,स्वभाषा व स्वाभिमान या विविध संपत्तीचे संगोपन करणारे , दानशूर परंतु रणशुर ,असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज,जगातील जन्मलेल्या युगपुरूषांच्या पंक्तीत बसण्यास सर्वथैव पात्र आहेत.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search