८/२९/२०१८

मी आणि माझा शत्रुपक्ष
"एका हातात घरची आणि एका हातात बाजारची 'विट' घेऊन मी त्याचं घर पहात हिंडत होतो.

एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला 'वीट' येणं का म्हणतात हे त्या दिवशी मला समजलं."


अगदी अलीकडली गोष्ट आहे.
शहर पुणे. दिवस मे महिन्याचे. रामराणा जन्मला ती टळटळीत दुपारची वेळ. एका अर्धवट बांधलेल्या घरापुढुन मी चाललो होतो इतक्यात हाक आली. मी एकदम चमकून पाहीलं.
''अरे वा! वा! वा!... अलभ्य लाभ'' असं म्हणत आणि बत्तीशीची चौसष्टी करत चुना, माती, दगड, विटा, राबीट...(हे बांधकामात राबीट काय असतं कुणास ठाउक पण असतं एक काहीतरी. जसं ब्रास नावाचं पितळेशी संबंध नसणारंही एक माप असतं तसं). तर ते राबीट आणि लोखंडी सळ्या यांच्यावरुन सशीच्या मागे धावणाऱ्या सश्यासारखा तो गृहस्थ धावत आला.
प्रथम मी त्याला ओळखलंच नाही, कारण घर बांधणीवरचा निम्मा चुना तो अंगावर बाळगून होता. त्यामुळे निम्म्या रंगवलेल्या फळीवरच्या गणपतीसारखा तो दिसत होता...


- पु.लं. (मी आणि माझा शत्रुपक्ष)

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search