८/१६/२०१८

भगीरथ धबधबा
पावसाळा सुरु होताच निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलू लागतं. मग सर्वांना वेध लागतात, ते निसर्गनिर्मित्त धबधब्यांचा आनंद लुटण्याचे. अशाच निसर्गप्रेमींना सध्या अंबरनाथ तालुक्यातील वांगणीचा भगीरथ धबधबा खुणावतोय. मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होऊ लागलीय.
पावसाळा म्हटलं की आनंदाचा सृजनाचा ऋतू.पावसाळ्यात निसर्गाला असा बहार येतो.हिरवाईनं नटलेल्या डोंगर-दऱ्यांमधून वाहणारं पाणी मनाचं पारणं फेडतो. डोंगर-कपारींतून वाहणारे छोटे-छोटे धबधबे पर्यटकांना साद घालू लगातात. अशापैकीच एक म्हणजे अंबरनाथ तालुक्यातील वांगणीजवळचा भगीरथ धबधबा. मुंबईपासून हा धबधबा अवघ्या दोन ते अडीच तासांच्या अंतरावर आहे. हा धबधबा निर्धोक आहे. शिवाय इथला निसर्ग पर्यटकांना निखळ आनंद देतो म्हणूनच इथं दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय.

वांगणीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर बेडीसगाव या आदिवासी वाडीजवळ हा धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. पण, या ठिकाणी जेवणाची सोय नाही. मुंबईतल्या रोजच्या धकाधकीनं त्रासलेल्यांसाठी भगीरथ धबधबा म्हणजे आनंदाची पर्वणीच... इथं आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं असं पर्यटक सांगतात.
 या धबधब्यांखाली डोंगररागांमधून कोसळणारे जलतुषार अंगावर झेलण्याची पर्यटकांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते. निळभोर आकाश, पाण्याचा खळखळाट, आपल्या अजस्त्र उंचींना कुणालाही सहजपणे व्यापतील असे डोंगर, पक्षांचा किलबिलाट हे सगळं शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर म्हणजे आश्चर्यच म्हणता येईल. त्यामुळे एकदातरी मुंबईपासून जवळ असलेल्या भगीरथ धबधब्याला आवर्जुन भेट द्यायलाच हवी.
संदर्भ: Zee News
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search