११/१०/२०१९

स्मरणरंजन : एक पु. ल. फॅण्टसी ताऱ्यांवरची वरात!


Image result for pu la deshpande
पु.ल. देशपांडे! मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा. नुकत्याच होऊन गेलेल्या १२ जून या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त-
'फॅन्टसी' हा प्रकार पु.लं.नी तसा फार कमी हाताळला. जशी 'गुळाचा गणपती'तील काही गाणी. विद्याधर पुंडलिक यांनी एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला होता, ''शुद्ध फॅन्टसीवर आधारित विनोद मराठीतून का येत नाही?'' पु.ल. म्हणाले होते, ''मला वाटतं फॅन्टसीला लागणारं जादूचं वातावरण आपल्याकडे नाही. फॅन्टसीचं जग हे जादूच्या नगरीसारखं असतं. अशी फॅन्टसी आपल्या संस्कृतीत कमी आहे. आपल्याकडे तशी भुतंखेतं आहेत, पण त्यात भीती तसंच चेष्टेचं एलिमेंट जास्त.. एक कृष्ण सोडला तर, देवाचीसुद्धा भीती घालण्याकडे आपला कल जास्त असतो. आपल्याकडे मुलांचा खास सांताक्लॉजही नाही.. आपल्याकडे फॅन्टसीचा पहिला स्पर्श बालकवींच्या 'फुलराणी' या कवितेत आला!''
'ती फुलराणी' पु.लं.नी थेट रंगमंचावर केली!
खरं तर रंगमंच-चित्रपट-दूरदर्शन या तीनही माध्यमांतून पु.लं.नी मुक्तसंचार केला, पण त्यांचं नाव जोडलं गेलं ते 'एकपात्री'शी! 'एकपात्री' या शब्दापेक्षा 'बहुरूपी' हा शब्द त्यांना जवळचा वाटायचा. त्यांच्या एकपात्रीतदेखील 'मूकनाटय़' (माईम) हा प्रकार हाताळला 'बटाटय़ाच्या चाळीत.' व्हिक्टोरियात बसलेल्या माणसांचे गचके, ती थांबल्यावर होणाऱ्या अ‍ॅक्शनला भरपूर टाळय़ा पडत. पण माईमसाठी नृत्यशास्त्रासारखं थोडं तरी शिक्षण आवश्यक आहे, असं त्यांना वाटायचं. कोणत्याही व्यक्तीचं व्यंग शोधणं हा मूळ स्वभाव असल्यामुळे, त्यांना अजून एका गोष्टीची चुटपुट होती, व्यंगचित्र न आल्याची. ते म्हणत, 'ड्रॉईंग मास्तरांनी माझ्या चित्रकलेशी जुळवून घेतलं असतं तर..' तर तोही प्रकार त्यांनी हाताळला असता. कदाचित मग शब्दांवर अतोनात प्रेम करणाऱ्या पुलंना व्यंग दाखविण्यासाठी शब्दांचीदेखील गरज पडली नसती!
चार्ली चॅप्लिनच्या 'ट्रम्प'ला देखील बोलपटापूर्वी 'मूकपटांत' अभिनयासाठी कधी शब्दांची गरज पडली नाही. पडद्यावर दिसणारे शब्द ही केवळ कथेची गरज असायची. चॅप्लिन तर पु.लं.चं दैवत.. 'चॅप्लिन हा मला नेहमीच एकमेवाद्वितीय वाटत आला आहे. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर माझ्या डोळय़ांत पाणी आलं. मी चटकन हात जोडून लांबूनच नमस्कार केला.. नंतर हसू आलं, पण त्याला इलाज नाही.' पु.लं.च्या घरात देवाची तस्वीर नसेलही, पण 'संगीत-साहित्य-संस्कृती'त रमलेल्या या बहुरूप्याच्या दिवाणखान्यात तीन गोष्टी होत्या. शांतिनिकेतन येथील शर्वरी रॉयचौधुरींनी घडविलेला, बडे गुलाम अली खाँसाहेबांचा अर्धपुतळा 'बस्ट', रवींद्रनाथांचं सुंदर रेखाचित्र अन् चार्ली चॅप्लिनचं भिडणारं छायाचित्र! याच रॉयचौधुरींनी पु.लं.चा पाल्र्यातील 'बस्ट' घडविताना पु.लं.चा चष्माच उडवला होता.. कारण 'चष्म्यामुळे डोळय़ांतील भाव हरवतात!' आपल्याला तोपर्यंत पु.लं.चा चष्मा हा चेहऱ्याचाच एक भाग वाटायचा. चष्म्याआडूनचं मिस्कील हास्य हीच तर खरी गंमत. चष्म्यामुळे त्या मिस्कीलपणाला फ्रेम मिळायची. चष्मा काय, दाढी काय, अशा गोष्टींच्या आख्यायिकाच होतात. 'एकदा चष्मा न लावलेले पु.ल. अन् दाढी उडवलेले पाडगांवकर पार्ले स्टेशनच्या ब्रिजवर समोरासमोर आले अन् एकमेकांकडे विचित्रपणे पाहात निघून गेले.. घरी गेल्यावर एकमेकांना फोन करून सांगितले, ''डिट्टो तुझ्यासारखा प्राणी पाहिला फक्त चष्मा/दाढी नव्हता/नव्हती.''
अशा आख्यायिकादेखील 'फॅन्टसी'च!
वर्षभरापूर्वीच्या एका घटनेतून अशीच एक फॅन्टसी निर्माण (!) झाली.
पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या पु.लं.च्या घरी चोरी झाली, ही घटना खरी. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी-दूरदर्शनवाल्यांनी अशी कव्हर केली की, 'पु.ल. कालबा झाले' म्हणणारे पु.लं.चे वारकरी हबकलेच. खाडकन भानावर आले. खरं तर एरवीदेखील लेखकाच्या घरी-त्यातून मराठी लेखकाच्या घरी चोरी होण्याएवढं ऐश्वर्य तर स्वप्नवत्च! अगदी 'पु.ल. देशपांडे' झाले म्हणून काय झालं? तेसुद्धा 'भाई' 'शब्दांच्या पलीकडल्या' जगात गेले असताना.. पण 'घडू नये ते घडले.' त्यात 'सुरांवरी हा जीव तरंगे' पासून पु.लं.ची सुटका नाहीच. शिवाय 'माझे जीवन गाणे' असणाऱ्या पु.लं.ना सुनीताबाई जॉईन झाल्यावर 'कधी वाऱ्यांतून कधी ताऱ्यांतून' 'निघाली वाऱ्यावरची वरात' असा 'पलीकडच्या' जगातला प्रवास नव्याने सुरू झाला. 'कोटय़ाधीश पु.ल'वरून कदाचित घबाड मिळण्याच्या उद्देशानं चोरानं फ्लटचं दार फोडलं..
..अन् 'हे कुणी फोडिले दार' असं 'ही कुणी छेडिली तार'च्या लकेरीवर गुणगुणत, सुरांवरून तरंगत, शब्दांच्या पलीकडल्या जगातून पु.लं.नी रंगमंचावर एन्ट्री घेतली! त्यांच्याच घरात त्या 'पाहुण्याला' पाहून प्रश्नच पडला, 'या घराचा मालक कोण? तरीही नेहमीच्या स्वभावानुसार हसून नमस्कार करीत त्यांनी पाहुण्याचं स्वागत केलं.
चोर-बीर असाल तर तुमचे कष्ट वाया गेलेयत्. इथं आता काय मिळणार तुम्हाला? चोरी-बीरी होण्याचा मलादेखील पूर्वानुभव नाही.. हां, आता आमच्या बटाटय़ाच्या चाळीत फुटकळ चोऱ्या भरपूर व्हायच्या. त्याहीपेक्षा हृदय चोरीच्या घटनाच जास्त.
''या मालक, आज असं अचानक अपरात्री येणं केलंत, तेही दार फोडून.. साहजिकच आहे म्हणा, सांगून सवरून मीडियाला बरोबर घेऊन यायला तुम्ही कुणी मंत्री वा कार्यकर्ते नव्हेत.. ते दिवसाढवळय़ा दरोडे घालतात! अरे हो, पण तुम्ही उभे का, बसा ना.!''
''हो, हो, ब..ब.. बसतो. तुम्ही पण ब..ब.. बसा की..'' चोराची ब..ब.. बोबडी वळली. काय माणूस (!) आहे हा. स्वत: मालक असून मलाच मालक म्हणतोय.. पण घर तर नेहमी बंद असायचं. असला भन्नाट अनुभव प्रथमच आल्याने, खट्टय़ाक्कन् चाकू उघडून मानेशी धरणं, पिस्तूल डोक्याशी धरणं वगैरे सराईतपणा तो विसरला अन् अवघडत धडपडत खुर्चीवर बसला. बसताना समोरच्या टीपॉयवरनं एक डबी खाली पडली..
''हं. बोला आता. कसं काय येणं केलं? चोर-बीर असाल तर तुमचे कष्ट वाया गेलेयत्. इथं आता काय मिळणार तुम्हाला? चोरी-बीरी होण्याचा मलादेखील पूर्वानुभव नाही.. हां, आता आमच्या बटाटय़ाच्या चाळीत फुटकळ चोऱ्या भरपूर व्हायच्या. त्याहीपेक्षा हृदयचोरीच्या घटनाच जास्त. त्यावर लिहिलंयदेखील भरपूर. शिवाय आमच्या शब्दांच्या दुनियेतदेखील वाङ्मयचौर्य भरपूर. पण रोजचंच झाल्यावर त्यावर किती लिहिणार? बरं काही चहा-पाणी.. अगं सुनीता..!''
पु.लं.नी 'उपदेशपांडय़ां'ना हाक मारली, तेव्हा त्यांना त्यांनीच केलेलं विडंबन आठवलं, ''प्रिये २२ चहा.. रात्रीचा समर सरुनी येत उष:काल हा २२''
''भाई, या वेळेस चहाबिहा मिळणार नाही हां. एक तर रात्र अजून सरायची आहे. दुसरं ते अपॉइंटमेंट न घेता आले आहेत.'' बॅकस्टेजवरून नुसताच आवाज.
चोराची आता पुरी तंतरली. जिथं कुणीच राहात नव्हतं, तिथं एक सोडून दोघं? ही काय भुताटकी आहे? माणूस तर 'जंटलमन' दिसतोय (!) चोराला चहाची ऑफर!
''राहू द्या हो भाईसाहेब. तसादेखील 'आपण' चहा सकाळी बाराला उठल्यावर घेतो. रात्री बारानंतर मात्र..''
''ठीक आहे.. आला अंदाज. पण त्याचा इथं काही उपयोग नाही. चहा राहिला, पण एरवी इथं दुसरं काय मिळणार तुम्हाला. मी फार छोटा माणूस आहे. आमच्याकडे पूर्वी गडकरी, कोल्हटकर, देवल, खाडिलकर, अत्रे वगैरे बरीच श्रीमंत मंडळी होऊन गेली. अत्र्यांनी तर पाढेदेखील 'बे एके बे' न म्हणता 'दोन हजार एके दोन हजार' म्हटले! ते खरे मोठे मासे. आम्ही छोटे मासे. त्यांच्याकडे शब्दभांडार भरपूर.. चांगली कमाई झाली असती तिकडे तुमची!''
''म्हणजे जसे तुम्ही कोटय़ाधीश, तसे ते डबल-टीबल कोटय़ाधीश?''
अन् प्रथमच 'कोटय़ाधीश' असण्याचा पु.लं.चा भ्रम दूर झाला. तरी विद्याधर पुंडलिकांना म्हटलं होतं मुलाखतीत, ''कोटीचा सोस असू नये, तो फार वाईट.'' हा विचार करताना त्यांना पुन्हा पुंडलिकांवरचीच कोटी आठवली, 'पुंडलिकाला म्हणावं त्याने फेकलेल्या विटेवर मी उभा नाही! घ्या.. जित्याची खोड मेलो तरी जात नाही, हे पुंडलिकांना 'वर' भेटल्यावर सांगितलं पाहिजे, असा विचार करत पु.ल. स्वत:शीच हसले.
''काय भाईसाहेब, आपल्याला मोजता येत नाही म्हणून हसताय होय?!''
''छे, छे, कोटीनंतर आम्हीदेखील 'कोटी'चं करतो आणि मोजता येत नसलं तरी कमावताय ना भरपूर? माझ्याकडे नुसते शब्दच भरपूर. त्यावर प्रकाशक श्रीमंत झाले. 'उरलं सुरलं', देखील 'पुरचुंडी' 'गाठोडं' बांधून नेलं, त्यांची पुस्तकं काढली. प्रेक्षक आणि प्रकाशक हेच आमचे मायबाप. तुम्हाला पण नाराज नाही करणार. काही शिल्लक असेल माळय़ावर, कानाकोपऱ्यांत वळचणीला, तर काढून ठेवीन मी तुमच्यासाठी. काढा मग पुस्तकं 'किडूकमिडूक' 'बाकी शिल्लक.' पुन्हा असेच येऊन डल्ला मारा. मी चुकूनदेखील फिरकणार नाही. सुनीतादेखील हल्ली माझ्याबरोबरच असते.. शब्दांचे पैसे होतील!''
''भाई, उगाच कमिट करू नकोस काही, नंतर सगळं मलाच निस्तरावं लागतं..''
चोराची हवा पुन्हा टाईट. कुठली अवदसा आठवली इथं येण्याची..
''शब्दांचे पैसे? काय राव 'खिल्ली' उडवताय गरिबाची!''
कुठलंही दार फोडून आत शिरायला याला किल्ली लागत नाही, पण 'खिल्ली माहीत आहे. वा! आधी भेटला असता तर दोन-चार भेटींत 'वल्ली'त जमा झाला असता, नामू परटासारखा!''
''होतात, होतात. शब्दांचेदेखील पैसे होतात. कुणी पुस्तकं लिहून, कुणी स्टेजवर-पडद्यावर बोलून कमवतात. कुणी खोटा शब्द देऊन वा शब्द फिरवून पैसे कमवतात.. या समोरच्या भिंतीवरच्या तसबिरीतल्या माणसाला ओळखत असाल कदाचित.''
अन् प्रथमच 'कोटय़ाधीश' असण्याचा पु.लं.चा भ्रम दूर झाला. तरी विद्याधर पुंडलिकांना म्हटलं होतं मुलाखतीत, ''कोटीचा सोस असू नये, तो फार वाईट.'
''लहानपणी पिक्चरमध्ये पाहिलंय याला.. मॅड कॉमेडी करायचा.. कुणी तरी चार्ली..''
''चार्ली चॅप्लिन. ओरिजिनल मॅड. त्यानं शब्दावाचून जगाला मॅड केलं. त्याच्याकडे तुम्ही जायला हवं होतं.''
''इथं पुण्यात राहतो का?''
''पुण्याचं तेवढं पुण्य नाही हो! पुणं सोडा, त्यानं साऱ्या जगाला हसवलं-रडवलं, कमावलं-गमावलं, आमच्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस!''
''हात्तिच्या, म्हणजे तो पण तुमच्यासारखाच.. काय मिळणार त्याच्याकडे?''
''त्याच्या डोक्यावरची ती हॅट अन् केन स्टिक दिसतेय? भरपूर होत्या त्याच्याकडे अशा. दोन-चार हाती लागल्या असत्या तर आयुष्यभराची ददात मिटली असती. परदेशात भरपूर किंमत असते, प्रसिद्ध व्यक्तींनी वापरलेल्या अशा गोष्टींना.''
''परदेशातलं सोडा भाईसाहेब, आपल्याकडे तसं नसतं ना.''
''खरंच आहे. मागे महात्मा गांधींचा चष्मा चोरीला गेला, आता जगाला त्याची किंमत कळेल..'' असं म्हणत पु.लं.नी त्या चोराच्या पायाशी पडलेल्या डबीकडे पाहिलं. चोराची टय़ूब पेटली. शब्दांचे पैसे, चार्ली चॅप्लिनच्या हॅट- केन स्टिकचे पैसे, गांधीजींच्या चष्म्याची किंमत.. मान लिया भाईसाहेबांना. एकदम 'जंटलमन.' त्यानेदेखील पायाशी पडलेल्या डबीकडे वाकून पाहिलं.. पुन्हा समोर पाहिलं, तेव्हा तिथं कुणीच नव्हतं! जंटलमन गायब! चोराची घबराट झालीच, त्याही परिस्थितीत खाली पडलेली डबी उचलून दुसऱ्या क्षणी तो दरवाजातून बाहेर पडला. सुसाट रस्त्याला लागला. अजून धडधडणं संपलं नव्हतं.. ही कसली भुताटकी?.. जे घडलं ते खरं की भास? भास कसा असेल? त्यानं खिसा चाचपून पाहिला. 'सेफ' ठिकाणी आडोशाला थांबला. खिशातनं डबी बाहेर काढली. ती चष्म्याची केस होती. केसवर सुवर्णाक्षरांत नाव, 'पु.ल. देशपांडे!' आतमध्ये काळसर तपकिरी फ्रेमचा चष्मा! तो मनोमन खूश झाला. 'चार्ली'सारखं 'पु. ल. देशपांडे' हे नावदेखील ओळखीचं होतं. कुणी तरी 'कोटय़ाधीश' म्हणालं, अन सगळा गोंधळ झाला. तरी 'या चष्म्याचीदेखील किंमत येईलच,' या विचाराने चोराच्या 'हसले मनी चांदणे'
.. रंगमंचावरून 'एक्झिट' घेत सुरांवरून तरंगत शब्दांच्या पलीकडच्या जगात जाताना पु.लं.नी सुनीताबाईंना विचारलं,
''काय गं सुनीता, तू तिथं कशी काय वेळेवर एन्ट्री घेतलीस रंगमंचावर? बरं झालं वेळेवर पोहोचलीस..''
''अन् काय रे भाई, मी चहा कुठनं देणार होते, तुझ्या आगंतुक पाहुण्याला? नेहमीप्रमाणे गोंधळ घालशील तो निस्तरावा लागेल मला, म्हणून हजर झाले. तुझ्या सगळय़ा 'खोडीं'ची मला 'गेल्या' जन्मापासून सवय आहे. तुझी कोटय़ा करायची जित्याची खोडदेखील अजून गेली नाही, तिथं माझा सुंभ जळला तरी 'पीळ' कसा जाईल..!''
''आहे मनोहर.. म्हणुनी जमते झकास!'' पु.लं.नी दाद दिली.
अन् 'कधी वाऱ्यांतून कधी ताऱ्यांतून' अशी सुनीताबाई आणि पु.लं.ची पुन्हा
'निघाली ताऱ्यांवरची वरात..
निघाली ताऱ्यांवरची वरात!'

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search