११/१०/२०१९

पुणेरी 'दुकानदार'

पुणेरी 'दुकानदार' हा अपुणेरी मंडळींच्या टीकेचा आवडता विषय आहे. आर्थिक फायदा हा मुळी पुणेरी दुकानदाराचा मूळ हेतू नसतोच. 'गिऱ्हाईक' हा आपला निष्कारण वेळ खायला येणारा प्राणी आहे, या तत्त्वावर त्याचा अढळ विश्वास आहे. 'गिऱ्हाइकांचं म्हणणं खरं असतं' हा जागतिक व्यापाऱ्यांचा सिद्धांत झाला. पण पुणेकर दुकानदाराचा सिद्धांत 'दुकानदाराचं म्हणणंच खरं असतं' असा आहे. गिऱ्हाईक पटवण्यापेक्षा कटवण्यातला आनंद त्याला जास्त मोलाचा वाटतो. आपण चांगला माल विकतो, ही एक सामाजिक सेवा आहे, ह्या भावनेने तो वागत असतो.

पुणेरी दुकानदाराचा स्पष्टवक्तेपणा पुणेकर गिऱ्हाइकालासुद्धा आवडतो. उद्या एखादा मराठी दुकानदार गिऱ्हाइकाशी गोड बोलायला लागला, तर हा आपल्याला नक्की फसवतो आहे, असाच पुणेकर गिऱ्हाइकाला वाटणार! याउलट, 'जिलबी ताजी आहे का ?' या प्रश्नाला 'इथं आम्ही शिळ्या विकायला नाही बसलो!' हा जबाब मालाची खात्री पटवून जातो. लबाडीच्या व्यवहाराला उद्धटपणा मानवत नाही. त्यामुळे, 'हॉटेलात गरम काय आहे ?' हा प्रश्न वेटरला अस्सल पुणेकर कधीच विचारत नाही. कारण पुणेरी हॉटेलातला सगळ्यात 'गरम' पदार्थ 'हॉटेल मालक' हा असतो हे तो जाणून आहे.

खरं तर मराठी दुकानदारी हा एक संपूर्ण प्रबंधाचा विषय आहे. 'गिऱ्हाईक कटवण्याचे १०० सुलभ मार्ग', हा ग्रंथ अजून लिहिला कसा गेला नाही, कोण जाणे! 

- पु.लं. (पुणे : एक मुक्तचिंतन, 'लोकसत्ता' दिवाळी अंक, १९९४)

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search