१२/१९/२०१९

राणी पद्मावती !


राणी पद्मिनी (पद्मावती ) खरोखर होऊन गेली का, की ती केवळ दंतकथा आहे, याबद्दल इतिहासतज्ज्ञांत मतभेद आहेत. असे असले, तरी राणी पद्मिनीचे लोकमानसातील स्थान अढळ आहे. मेवाडचा राणा असलेल्या रावळ रतनसिंह याची पत्नी राणी पद्मिनी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. तिला मिळवण्यासाठीच अल्लाउद्दीन खिलजी या मुघल शासकाने १३०२मध्ये चितोडगडला वेढा घातल्याचा उल्लेख काही ग्रंथांत आढळतो. मात्र, काही तज्ज्ञांना पद्मिनीची ही कथा खरी वाटत नाही. रतनसिंहाने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला. मात्र, काही काळाने त्याला शरणागती पत्करावी लागली. त्यानंतर लक्ष्णसिंहाने लढाई सुरूच ठेवली. या लढाईत अखेर तो धारातीर्थी पडला. त्यानंतर राणी पद्मिनी आणि किल्ल्यातील इतर स्त्रियांनी शत्रूच्या तावडीत सापडू नये, यासाठी धगधगत्या चितेत उडी घेऊन ‘जोहार’ केला. पद्मिनीचे सौंदर्य आणि तिने शीलरक्षणासाठी केलेला जोहार यामुळे तिची कथा सर्वदूर पसरली.
राणी पद्मिनीच्या या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या पुढच्या काळात अनेक लेखकांनी लिहिल्या आहेत, त्यावर कविता आणि वीरगाथा रचल्या आहेत.
राणी पद्मिनीवरील सर्वांत पहिले काव्य म्हणजे सुफी कवी जायसी मलिक महंमद याने लिहिलेले ‘पद्मावत.’ जायसी याने १५४०च्या सुमारास अवधी हिंदी भाषेत लिहिलेल्या या काल्पनिक खंडकाव्यात चितोडगडला अल्लाउद्दीन खिलजीने घातलेला वेढा आणि राणी पद्मिनीचा जोहार या ऐतिहासिक घटनांचा आधार घेतला आहे. यामध्ये चितोडचा राजा रतनसेन, सिंहलद्वीपची (श्रीलंका) राजकन्या पद्मिनी यांची प्रेमकथा आहे. रूपकांची सुंदर मांडणी करून हे काल्पनिक काव्य लिहिले आहे. यात चितोड म्हणजे शरीर, राजा म्हणजे मन, सिलोन (श्रीलंका) म्हणजे हृदय, पद्मिनी म्हणजे बुद्धी, अल्लाउद्दीन म्हणजे लालसा अशा रूपकांचा वापर केला आहे. खिलजीसोबतच्या लढाईत रतनसेनाचा पराभव होऊनही पद्मिनी सती गेल्याने तिच्या प्रेमाचा विजय होतो; तर गड जिंकूनदेखील खिलजीची वासना पराभूत होते, असे या कथेचे सार आहे. सुफी काव्यात जायसीचे ‘पद्मावत’ उत्कृष्ट काव्यरचना मानले जाते.
राजपूत वीरगाथांमध्ये राणी पद्मिनीची कथा सांगितली आहे. हमरतन याने १५८९मध्ये रचलेली ‘गोरा बादल पद्मिनी चौपाई’ त्यापैकी एक. यामध्ये रावळ रतनसिंह याने सिंहल देशातील (श्रीलंका) राजकन्या पद्मिनीशी केलेला विवाह, तिच्या सौंदर्याची महती ऐकून दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने चितोडगडवर केलेली स्वारी, त्यानंतर कपटाने राणा रतनसिंहाला केलेली अटक यांचा समावेश आहे. या कथेत गोरा आणि त्याचा पुतण्या बादल या राजपूत योद्ध्यांचा उल्लेख येतो. लढाई करून गोरा आणि बादल खिलजीच्या तावडीतून राणाला सोडवून पुन्हा किल्ल्यावर पाठवतात, असे वर्णन आहे. १८व्या आणि १९व्या शतकात अनेक कवींनी ही कथेवर रचना केल्या आहेत.
राणी पद्मिनीच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून आलेला उल्लाउद्दीन खिलजी तिचे रूप पाहायाला मिळावे, अशी विनंती रतनसिंहाला करतो. रक्तरंजित संघर्ष टाळण्यासाठी अखेर राणीचे रूप खिलजीला आरशात दाखवले जाते. त्यानंतर रतनसिंह खिलजीला निरोप द्यायला किल्ल्याबाहेर येतो. त्या वेळी खिलजी रतनसिंहाला कपटाने अटक करतो. या प्रकारानंतर राणी पद्मिनी रतनसिंहापासून दूर गेलेला त्याचा सेनापती गोरा याला शोधून काढते. खिलजीसोबत शस्त्रसंधी केल्याने गोरा नाराज असतो. मात्र, त्याची समजूत काढून राणी त्याला या संकटाची कल्पना देते. त्यानंतर गोरा आणि त्याचा तरुण पुतण्या बादल चातुर्याने राणाची सुटका करतात. यात राणी अल्लाउद्दीनकडे यायला तयार असल्याचा संदेश खिलजीला पाठवला जातो. त्याच वेळी राणीसोबत तिच्या सातशे मैत्रिणीही येणार असल्याचे कळवले जाते. गोरा आणि बादल सातशे पालख्या सजवून तयार करतात. त्या पालख्यांमध्ये राजपूत योद्धे बसून जातात आणि राणा रतनसिंहाची सुटका करून त्यांना सुखरूप चितोडगडला पाठवतात. मात्र, या लढाईत गोरा आणि बादल यांना वीरमरण येते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्येही राणी पद्मिनीबद्दल अशा स्वरूपाची माहिती दिली आहे. ‘भारत एक खोज’ या मालिकतेही हा भाग आहे. राजस्थानातील प्रसिद्ध कवी पं. नरेंद्र मिश्र यांनी गोरा, बादल आणि पद्मिनी यांच्या कथेवर ‘दोहराता हूँ सुनो रक्त से लिखी हुई कुरबानी’ ही वीररसातील सुंदर हिंदी कविता लिहिली आहे. पं. मिश्रा, तसेच कवी कुमार विश्वास यांचे या कवितेच्या सादरीकरणाचे व्हिडिओ यू-ट्यूबवर आहेत.
राणी पद्मिनीचे सुंदर व्यक्तिमत्त्व, पद्मिनीला मिळवण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीने चितोडगडला घातलेला वेढा, राणीने केलेला जोहार या सगळ्या अद्भुत कथाबीजाची मोहिनी अनेक कलाकारांवर पडली. कोल्हापूर येथील बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीने १९२४मध्ये ‘सती पद्मिनी’ हा चित्रपट तयार केला होता. इंग्लंडमधील वेम्बले येथील चित्रपट महोत्सवात १९२५मध्ये ‘कल्याण खजिना’ आणि ‘सती पद्मिनी’ हे दोन चित्रपट भारताचे प्रातिनिधिक चित्रपट म्हणून दाखवले होते. हिंदीमध्ये १९६४मध्ये ‘महाराणी पद्मिनी’ हा चित्रपट आला होता. पद्मिनीच्या कथेवर फ्रेंच ऑपेरा दिग्दर्शक अल्बर्ट रसेल यांनी १९२३मध्ये ‘पद्मावती’ हा ऑपेरा बसवला होता. राजस्थानातील चितोडगडला भेट दिल्यानंतर प्रेरणा घेऊन त्यांनी या ऑपेराची निर्मिती केली. रसेल यांनी या ऑपेराच्या संगीतात भारतीय सुरावटींचाही वापर केला होता. नाटककार पु. भा. भावे यांनी १९७१मध्ये लिहिलेले ‘महाराणी पद्मिनी’ हे नाटक गाजले होते. १९६८-६९मध्ये त्यांनी ‘चितोड यात्रा’ हे प्रवासवर्णनही लिहिले होते.
रावळ रतनसिंह हा गुहिलोत घराण्यातील राजा. चितोडगडावरून राज्यकारभार करणारा रतनसिंह १३०२मध्ये मेवाडच्या सत्तेवर आला आणि १३०३मध्ये अल्लाउद्दीन खिलजीकडून त्याचा पराभव झाला. त्या वेळी पद्मिनीने राजपूत स्त्रियांसह जोहार केला होता. अल्लाउद्दीन खिलजीसोबत त्या मोहिमेत आमीर खुसरो हा कवीदेखील होता. त्याच्या साहित्यात चितोडगडच्या संदर्भाने राणी पद्मिनी, तिने केलेला जोहार यांचा उल्लेख आढळत नाही. मात्र, राजपूत स्त्रियांमध्ये जोहारची परंपरा पूर्वीपासून होती. गुजरातच्या बहादूरशहाने १५३४मध्ये, तसेच अकबराने १५६७मध्ये चितोडगड जिंकून घेतला होता. तेव्हा १५३४मध्ये महाराणा संग्रामसिंह याची पत्नी कर्मवतीने, तसेच १५६७च्या आक्रमणावेळीही अनेक राजपूत स्त्रियांनी जोहार केला होता. चितोडगडावर ही ठिकाणे आहेत. राजस्थानात या जोहारांच्या स्मृती जपण्यासाठी दर वर्षी मेळे भरतात. त्यात राणी पद्मिनीचा जोहार मोठा भरतो. चितोडगडावर पद्मिनी महाल म्हणून एक महालही आहे. तेथील आरशातच पद्मिनीचे प्रतिबिंब खिलजीने पाहिल्याचे सांगितले जाते. तसे आरसेही तेथे बसवलेले आहेत. मात्र, राणीला कधीच आरशात दाखवण्यात आले नव्हते. हा प्रकार इतिहासाचे विकृतीकरण असल्याचा दावा राजपूत करनी सेनेने केला आहे. काही व्यक्तींनी या महालात घुसून हे आरसे फोडल्याचा प्रकार घडला होता. राणी पद्मिनी होऊन गेली, की ती फक्त दंतकथा आहे, असा प्रश्न पडतो. मात्र, राणी पद्मिनीने जोहार करून केलेला त्यागाची महती लोकसाहित्यातून प्रकट होत राहिली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगितल्या जाणाऱ्या हकिकतींमधून राणीची ही प्रतिमा तयार झाली आहे. तिच्या इतिहासाबाबत मतभेद असले, तरी लोकमानसात राणी पद्मिनीची अमिट छाप कोरली गेली आहे.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search